Sunday , July 26 2026
Breaking News

पहिल्याच मुसळधार पावसात बेळगाव जलमय!

Spread the love

 

शिवाजीनगर, पंजी बाबा, किल्ला तलाव परिसरात पाणी तुंबले; ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा, घरांमध्येही पाणी शिरले

बेळगाव : पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे दावे करणाऱ्या महानगरपालिकेची पहिल्याच मुसळधार पावसाने पोलखोल केली. शहरातील सर्वात गंभीर ठरलेली ड्रेनेज समस्या पुन्हा एकदा उफाळून आली असून, शिवाजीनगर–पंजी बाबा आणि किल्ला तलाव परिसर जलमय झाला. जलवाहिन्या, गटारी आणि ड्रेनेजमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेल्या प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला. परिणामी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले, तर अनेक घरांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.

पहिल्याच जोरदार पावसात शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेचे अपयश उघड झाल्याने महानगरपालिकेच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी त्याच ठिकाणी पाणी तुंबत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अमान सेठ आणि स्थानिक नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून ड्रेनेज, गटारी आणि जलवाहिन्यांमध्ये अडकलेला प्लास्टिक व इतर कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या. साचलेल्या पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी पंपाच्या सहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले.

यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी शहरातील गटारी आणि ड्रेनेजची नियमित साफसफाई होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप केला. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागत असल्याने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता जलनिस्सारण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, हवामान खात्याने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सखल भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना करून ठेवण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *