Sunday , September 20 2026
Breaking News

मोहिशेत गाव आजही चिखलाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा संताप

Spread the love

 

खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज लोंढा येथे जावे लागते. मात्र खराब रस्त्यामुळे लहान मुलांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आजारी नागरिक, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याअभावी गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायत अस्तित्वात येऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटला तरी रस्त्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. अनेकदा मागणी करूनही केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

मोहिशेत गावातील नागरिकांनी तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करून खड्डेमुक्त, दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *