Sunday , July 26 2026
Breaking News

बेलेवाडी काळम्माचा हरित संकल्प गायरान ते हिरवेगार स्वप्न; राणेवाडी मार्गाच्या दुतर्फासह गायरानवर वृक्षारोपण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : वाढत्या तापमानाने, अनियमित पावसाने आणि झपाट्याने कमी होत चाललेल्या हरित क्षेत्राने जगासमोर गंभीर पर्यावरणीय संकट उभे केले आहे. अशा परिस्थितीत बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. गावातील रानेवाडी रस्त्याकडील गायरान जमिनीवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून “हरित गाव, समृद्ध गाव” या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत, महिला संघटना, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून पार पडलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लावण्यात आलेली झाडे भविष्यात प्रवाशांना सावली, पक्ष्यांना निवारा, नागरिकांना शुद्ध प्राणवायू आणि पुढील पिढ्यांना हिरवागार वारसा देणार आहेत. या वृक्षारोपण अभियानात पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, आनंदराव पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच बजरंग कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सुतार, अजित पाटील, गीतांजली पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वीरेंद्र मगदूम, गावातील प्रतिष्ठित नागरिक दशरथ कांबळे सर, आर. के. पाटील, मोहन पाटील, विनोद मुदाळकर, माजी सरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, ऑपरेटर, सीआरपी शुभांगी पाटील, सुप्रिया पाटील, श्री स्वामी समर्थ महिला महासंघाच्या अध्यक्षा व सदस्य, आनंदराव पाटील प्रशाले शिक्षक, कर्मचारी, प्राथमिक शाळा बेलेवाडी काळम्मा येथील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी टी. एस. गडकरी आणि दशरथ कांबळे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करत मनोगते व्यक्त केली. वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून मानवाच्या अस्तित्वाचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
भूमी वात्सल्यचे संस्थापक नामदेवराव चौगुले यांनी, पर्यावरण विषयावर चिंतन करण्याची वेळ निघून चालली असून आता कृतीची वेळ आली आहे. प्रत्येक कुटुंबाने किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण पुढील पिढ्यांसाठी पैसा नव्हे तर शुद्ध हवा, चांगले वातावरण आणि फळांनी बहरलेला निसर्गाचा ठेवा ठेवून जाऊ या,” असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आगामी काळात गावात अधिक व्यापक वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बेलेवाडी काळम्माने उचललेले हे हरित पाऊल परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश देणारा हा उपक्रम बेलेवाडी काळम्माच्या सामाजिक बांधिलकीचा आणि निसर्गप्रेमाचा जिवंत पुरावा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *