Monday , September 21 2026
Breaking News

तीव्र विरोधापुढे टाटा पॉवरची माघार; कर्नाटकातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाला ब्रेक

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकातील वीज वितरण व्यवस्थेच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला राज्यभरातून झालेल्या तीव्र विरोधामुळे अखेर टाटा पॉवर कंपनीला माघार घ्यावी लागली आहे. कर्नाटक वीज नियामक आयोग (केईआरसी) यांनी प्रस्तावावर आक्षेप नोंदविल्यानंतर कंपनीने वीज वितरणाचे कंत्राट मिळविण्याचा प्रस्ताव मागे घेतला. या निर्णयामुळे हेसकॉमसह राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही आठवड्यांपूर्वी टाटा पॉवर कंपनीने कर्नाटकातील वीज वितरण व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी केईआरसीकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामुळे राज्यातील हेसकॉम, बेसकॉम, मेस्कॉम, चेस्कॉम, गेस्कॉम आदी सरकारी वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात खासगी कंपनीची एंट्री होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी वीज वितरणाच्या खाजगीकरणाचा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.

या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच शेतकरी संघटना, वीज कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. वीज वितरणाचे खाजगीकरण झाल्यास ग्राहकांवरील आर्थिक भार वाढेल, कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींवर परिणाम होईल आणि सार्वजनिक वीज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत राज्यभर आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती.

वाढता जनक्षोभ, संघटनांचा दबाव आणि केईआरसीने उपस्थित केलेले आक्षेप यांचा विचार करून टाटा पॉवर कंपनीने अखेर आपला प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे वीज वितरणाचे खाजगीकरण तूर्तास टळले असून सरकारी वीज वितरण कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *