

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिटणी येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता, शिक्षकांची कथित बेजबाबदार वर्तणूक आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एका ग्रामस्थाने गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा ३ ऑगस्ट २०२६ पासून शाळेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शाळेची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहत नसल्याचा, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा तसेच अंतर्गत वादांमुळे शाळेचे वातावरण बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून पटसंख्याही सातत्याने घटत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षात दोन वर्ग बंद करण्याची वेळ आल्याचाही उल्लेख निवेदनात आहे.
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ग्रामस्थ आणि पालकांकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांनाही परिस्थितीची कल्पना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाळेतील विद्यमान शिक्षकांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी नवीन व कर्तव्यदक्ष शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ पासून सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा, हिटणी येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, त्यासंदर्भातील सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta