Sunday , July 26 2026
Breaking News

‘एसआयआर’च्या नावाखाली मराठी मतदारांवर घाला?

Spread the love

 

एकाही मराठी भाषिकाचे नाव वगळू देणार नाही; बूथ निहाय यंत्रणा तातडीने उभी करण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आदेश

बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांची नावे वगळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक मराठी भाषिक मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून जबाबदारी स्वीकारावी. त्याचबरोबर प्रत्येक भागातून बूथ निहाय प्रतिनिधींची नावे तातडीने सादर करून सक्षम संघटनात्मक यंत्रणा उभी करावी, असा ठाम निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मराठा मंदिर येथे रविवारी झालेल्या समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत एसआयआर प्रक्रियेदरम्यान मराठी भाषेत अर्ज स्वीकारले जात नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, मतदारांच्या तक्रारी आणि पुढील न्यायालयीन लढ्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच समितीनेही बूथ निहाय प्रतिनिधींची यादी सादर करण्यास सांगितल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रत्येक विभागातून तातडीने प्रतिनिधींची नावे पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदार यादीतील त्रुटी आणि तक्रारींसंदर्भात न्यायालयीन लढा उभारण्याचाही गंभीरपणे विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने स्वतःच्या मतदार नोंदणीची जबाबदारी स्वीकारली, तर एकाही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

समिती नेते रमाकांत कोंडुस्कर बोलताना म्हणाले की, काही राजकीय नेते स्वतःचे फोटो लावून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप केला. अशा भूलथापांना बळी पडू नका आणि कोणत्याही परिस्थितीत आपला व्हॉट्सअप क्रमांक अनोळखी व्यक्तींना देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

ॲड.अमर येळुरकर आणि ॲड. एम. जी. पाटील यांनी एसआयआर प्रक्रियेचे कायदेशीर पैलू आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

बैठकीत रणजीत चव्हाण पाटील, मदन बामणे, अमित देसाई, शुभम शेळके, श्रीकांत कदम, मोतेश बारदेशकर, राजू भातकांडे, प्रकाश अष्टेकर, पियुष हवळ, सागर पाटील, रणजीत हवाळाणाचे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीला आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *