Sunday , September 20 2026
Breaking News

संततधार पावसाचा कहर; हब्बनहट्टीचे मारुती मंदिर पाण्याखाली

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील मलप्रभा नदीसह म्हादई, मंगोत्री, काळी, पांढरी आणि मार्कंडेय नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम घाटासह तालुक्याच्या सर्वच भागात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक गावांतील नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. शनिवारी रात्री कणकुंबी, जांबोटी, शिरोली, हेम्माडगा परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली असतानाही काही ठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास व मासेमारी करत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मलप्रभा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मंदिर परिसरात पाणी साचल्याने तेथे जाणे धोकादायक बनले असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *