

बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) 2026’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व नोंदणीसाठी २९ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी मराठी भाषिक मतदारांना कन्नड भाषेतील फॉर्म दिले जात असल्याने फॉर्म भरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही भागांत बीएलओकडून फॉर्मच न मिळाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
अशा परिस्थितीत नागरिकांनी बीएलओची वाट न पाहता घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
ऑनलाईन अर्ज कसा भराल?
– अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Fill Enumeration Form’ पर्याय निवडा.
– मोबाईल क्रमांक व ओटीपीच्या मदतीने नोंदणी करा.
– राज्य निवडून EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकून माहिती पडताळा.
– मोबाईल क्रमांक EPIC शी लिंक नसेल तर फॉर्म-८ भरून लिंक करा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधार-आधारित e-Sign करून अर्ज सादर करा.
अर्जाची स्थिती कशी तपासाल?
पुन्हा पोर्टलवर जाऊन ‘Fill Enumeration Form’ वर क्लिक करा. EPIC क्रमांक टाकून शोध घेतल्यास अर्ज यशस्वीरीत्या सादर झाला असल्यास त्याचा संदेश दिसेल. नवीन फॉर्म उघडल्यास अर्ज अद्याप नोंदवला गेलेला नाही, असे समजावे.
या गोष्टी लक्षात ठेवा
– ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रावरील नावाची माहिती पूर्णपणे जुळणे आवश्यक आहे. म्हणजेच, मतदाराचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या सर्व बाबी दोन्ही कागदपत्रांमध्ये एकसारख्या असल्या तरच अर्ज ऑनलाइन सादर करता येतो.
उदाहरणार्थ, जर आधार कार्डावर “सदानंद संजय सपकाळ” असे नाव असेल, तर मतदार ओळखपत्रावरही “सदानंद संजय सपकाळ” असेच नाव असणे आवश्यक आहे. जर मतदार ओळखपत्रावर केवळ “सदानंद सपकाळ” असे नाव नोंदलेले असेल, तर दोन्ही नोंदी जुळत नसल्यामुळे अर्ज ऑनलाइन सादर करता येत नाही.
– बीएलओकडून फॉर्म मिळाला नसेल किंवा भाषेची अडचण असल्यास ऑनलाईन पर्यायाचा वापर करा.
– कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास १९५० या निवडणूक आयोगाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यातील मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी २९ जुलैपूर्वी SIR फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta