Monday , September 21 2026
Breaking News

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज बेळगावात; शहर अभेद्य सुरक्षा कवचात

Spread the love

 

अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीसाठी आठवडाभर मुक्काम; तीन ठिकाणे ‘रेड झोन’, ड्रोन उड्डाणास बंदी

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी (६ जुलै) बेळगावात दाखल होत असून, त्यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. पुढील आठवडाभर बेळगावात त्यांचे वास्तव्य राहणार असून, संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहर अक्षरशः अभेद्य सुरक्षा कवचात गुंडाळण्यात आले आहे.

१० ते १२ जुलैदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीसाठी देशभरातील वरिष्ठ संघ पदाधिकारी बेळगावात एकत्र येणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, शाखा बळकटीकरण, प्रशिक्षण शिबिरे, सेवा प्रकल्प आणि आगामी कार्यदिशा यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत मंथन होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संघ परिवारासह राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

डॉ. भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ६ ते १४ जुलै या कालावधीत बेळगाव फाउंड्री क्लस्टर, संत मीरा स्कूल (भाग्यनगर एक्स्टेन्शन) आणि श्री जगन्नाथराव जोशी समदर्शन भवन (गुडशेड रोड) या तीन परिसरांच्या दोन किलोमीटरच्या हद्दीला ‘रेड झोन’ (नो-फ्लाय झोन) घोषित केले आहे. या परिसरात ड्रोन, यूएव्ही (UAV), यूएएस (UAS) तसेच पॅराग्लायडर उड्डाणावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

या तिन्ही ठिकाणी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणाही सतर्क असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

डॉ. मोहन भागवत यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे पुढील काही दिवस शहरात संघाच्या विविध बैठका आणि कार्यक्रमांची मालिकाच रंगणार आहे. देशभरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे बेळगाव राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या संघटनात्मक घडामोडींचे केंद्र ठरणार असून, संपूर्ण दौऱ्याकडे प्रशासनासह राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *