Monday , September 21 2026
Breaking News

दूधसागरचा मोह ठरला महाग; रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर आरपीएफची धडक कारवाई; ₹१६ हजारांचा दंड

Spread the love

 

बेळगाव/कॅसल रॉक : पावसाळ्यात फेसाळणाऱ्या दूधसागर धबधब्याचे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. मात्र, हा मोह आता पर्यटकांच्या खिशालाच नव्हे तर जीवावरही बेतू लागला आहे. वारंवार इशारे, बंदी आदेश आणि कठोर निर्बंध झुगारून रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) रविवारी धडक कारवाई करत तब्बल ₹१६ हजारांचा दंड वसूल केला.

हुबळी विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलातर्फे राबविण्यात आलेल्या सप्ताहांत विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. कॅसल रॉक येथील RPF उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने दूधसागर (DDS) ते सोनालियम (LIM) या रेल्वे स्थानकांदरम्यान अचानक तपासणी केली. यावेळी अनेक पर्यटक जंगलातील वाटांचा वापर करून प्रतिबंधित रेल्वे हद्दीत घुसून थेट रेल्वे रुळांवरून धबधब्याकडे जात असल्याचे आढळून आले.

रेल्वे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येक पर्यटकावर ₹५०० दंड ठोठावण्यात आला. या कारवाईत एकूण ₹१६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

दूधसागर धबधब्याकडे जाणारा रेल्वे मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला असतानाही अनेक पर्यटक नियमांना केराची टोपली दाखवत जीवघेणा प्रवास करत आहेत. अतिवेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या, अरुंद पूल, बोगदे आणि निसरडे रुळ यामुळे कोणतीही छोटी चूक मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अशा बेकायदेशीर ट्रेकमुळे केवळ पर्यटकांच्याच जीवाला नव्हे, तर रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘नियम मोडाल तर कारवाई अटळ’ असा स्पष्ट इशारा दक्षिण पश्चिम रेल्वेने दिला आहे. संपूर्ण पावसाळ्यात प्रतिबंधित रेल्वे मार्गांवर विशेष तपासणी मोहीम सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पर्यटकांनी केवळ अधिकृत व सुरक्षित मार्गांचाच वापर करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गोवा–कर्नाटक सीमेवरील कॅसल रॉकजवळील दूधसागर धबधबा पावसाळ्यात देशभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र, वाढत्या गर्दीबरोबरच बेकायदेशीर ट्रेकिंगच्या घटनाही वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने देखरेख आणखी कडक करत अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *