Monday , September 21 2026
Breaking News

कल्लोळजवळ कृष्णेचा रौद्रावतार; दत्त मंदिर पाण्याखाली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Spread the love

 

चिक्कोडी : महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता कर्नाटकच्या सीमाभागातही दिसू लागला आहे. चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठावरील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

सध्या कृष्णा नदीत सुमारे १ लाख ३५ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, नदीची पातळी तासागणिक वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णेसह वेदगंगा आणि दूधगंगा नद्या देखील दुथडी भरून वाहत असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

कल्लोळ येथील नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त मंदिरात पाणी शिरल्याने मंदिर परिसर जलमय झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी दत्तात्रेय मंदिरातील दर्शन तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने नदीकाठावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारले असून, नागरिक आणि पर्यटकांना नदीच्या पात्राजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे चिक्कोडी तालुक्यातील सखल भागांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *