

हरियाणातील टोळीचा संशय : शहर सायबर पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाचा आणखी एक धक्कादायक नमुना बेळगावात समोर आला आहे. केवळ एका एपीके (APK) फाईलच्या माध्यमातून ८१ वर्षीय वृद्धाचा मोबाईल हॅक करत सायबर चोरट्यांनी तब्बल २० लाख ८८ हजार १६७ रुपयांवर डल्ला मारला. सदाशिवनगर येथील या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, हरियाणास्थित सायबर टोळीचा यात हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सदाशिवनगर येथील ईश्वराप्पा (वय ८१) यांनी अज्ञातांविरुद्ध शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. २५ जून रोजी सकाळी १०.३० ते २६ जून रोजी सायंकाळी ५ या कालावधीत ही फसवणूक घडली.
ईश्वराप्पा यांचे सिमकार्ड बंद झाल्याने त्यांनी एअरटेल कार्यालयातून नवीन सिमकार्ड घेतले. मात्र, सिम सुरू होताच काही मिनिटांतच त्यांच्या तीन बँक खात्यांतील तब्बल २०.८८ लाख रुपये गायब झाल्याचे उघड झाले. घाबरलेल्या ईश्वराप्पा यांनी तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधत व्यवहार बंद करून घेतले. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
तपासात धक्कादायक बाब समोर आली. ईश्वराप्पा यांच्या नकळत त्यांच्या मोबाईलमध्ये एपीके फाईल डाउनलोड करण्यात आली होती. या फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी मोबाईलचा पूर्ण ताबा मिळवत मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यांवर डल्ला मारला आणि लाखो रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे अनोळखी APK फाईल, लिंक किंवा अँप डाउनलोड करणे किती घातक ठरू शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta