Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; हेरॉईन व गांजा जप्त, चौघे ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे ६.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणांमध्ये हेरॉईन आणि गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत सीसीबी पोलिसांनी ८ जुलै २०२६ रोजी केएचबी बास्केटबॉल कोर्ट, बसवण कुडची परिसरात छापा टाकून शिवप्रसाद महादेव ज्योती (२१, रा. देवराज अरस कॉलनी, बेळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५.०१ ग्रॅम हेरॉईन (किंमत ३ लाख रुपये) व एक मोबाईल (५ हजार रुपये) असा एकूण ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत हे हेरॉईन बेळगावातील मॅडी उर्फ विनायक याच्यामार्फत विक्रीसाठी आणण्यात आले असून ते मुंबईतील एका महिलेकडून मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत काकती पोलिसांनी होनगा औद्योगिक परिसरातील रसोई हॉटेलजवळ छापा टाकून भूषण बाळेकुंद्री (२२), आदित्य कांबळे (२२) आणि प्रशांत कांडेकर (१९) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७७९ ग्रॅम गांजा (१० हजार रुपये), दोन मोबाईल (५१ हजार रुपये) आणि एक होंडा सिटी कार (३ लाख रुपये) असा एकूण ३.६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

या दोन्ही यशस्वी कारवाया करणाऱ्या सीसीबी व काकती पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *