Monday , September 21 2026
Breaking News

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बिगुल; १३ जुलैला निर्णायक ऑनलाईन समुपदेशन

Spread the love

 

गैरहजर राहिल्यास ‘डमी कौन्सलिंग’द्वारे थेट नियुक्ती : धारवाड अतिरिक्त आयुक्त कार्यालयाचे वेळापत्रक जाहीर

बेळगाव : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेला आता वेग आला असून, पुढील आणि महत्त्वपूर्ण टप्प्याला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षे एकाच कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन समुपदेशन (कौन्सलिंग) प्रक्रियेद्वारे करण्यात येणार असून, यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक धारवाड येथील अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार यापूर्वी चार टक्के विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता उर्वरित २० टक्के बदल्या सार्वजनिक हित, प्राप्त तक्रारी आणि दीर्घकाळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागाकडून थेट कौन्सलिंगच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.

यासाठी विभागाकडून पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, सेवा कालावधी, ज्येष्ठता, गुण, प्राधान्यक्रम आणि लागू सवलतींचा विचार करून अंतिम क्रमवारी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी बोलावण्यात येईल.

विशेष म्हणजे, समुपदेशनासाठी उपस्थित राहून उपलब्ध रिक्त जागांमधून पसंतीचे ठिकाण निवडणे बंधनकारक राहणार आहे. जर एखादा कर्मचारी समुपदेशनास गैरहजर राहिला किंवा उपलब्ध पर्यायांमधून ठिकाणाची निवड केली नाही, तर त्याची ‘डमी कौन्सलिंग’द्वारे उपलब्ध रिक्त पदावर थेट नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या प्रक्रियेबाबत उत्सुकतेबरोबरच धास्तीही निर्माण झाली आहे.

विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १३ जुलै रोजी ऑनलाईन समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर बदली आदेशांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. शिक्षण विभागातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आता या प्रक्रियेकडे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *