Monday , September 21 2026
Breaking News

राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक संवाद कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेला ‘शैक्षणिक संवाद’ व अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व, शिक्षकांची भूमिका आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक दिशा यावर या कार्यक्रमात सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जयंत नार्वेकर, सुभाष ओऊळकर, नारायण उडकेकर आणि बी. बी. शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी आणि बी बी शिंदे सर यांच्यावर प्रेम करणारे मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणारे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत नार्वेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बदलत्या काळात शिक्षण अधिक विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी आधुनिक अध्यापन पद्धतींचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
सुभाष ओऊळकर यांनी शिक्षण हे केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी आदर्श भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
नारायण उडकेकर यांनी मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा आणि अभिव्यक्तीचा अधिक प्रभावी विकास होतो, असे नमूद केले. शाळा, पालक आणि समाज यांच्यातील समन्वय मजबूत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ शिक्षक बी. बी. शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ अध्यापन अनुभवातून शिक्षकांनी सतत अध्ययनशील राहण्याचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, शिस्त, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि संस्कार रुजविण्याचे कार्य शिक्षकांनी निष्ठेने पार पाडले पाहिजे, असे ते म्हणाले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कार्यक्रमात बी बी शिंदे सर यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने शिंदे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री धिरजसिंह राजपूत यांनी मांडले. या कार्यक्रमाला शिवाजी कागणीकर, प्रबोधिनीचे सदस्य सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, मालोजी अष्टेकर, नीला आपटे, गौरी चौगुले, गजानन सावंत, बी. जी. पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *