Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचा समारोप; संघ विस्तार, सामाजिक उपक्रमांसह राममंदिर दानपेटी प्रकरणावरही चर्चा

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या वार्षिक बैठकीचा रविवारी बेळगाव येथे समारोप झाला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह देशभरातील २२६ वरिष्ठ पदाधिकारी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत संघाच्या आगामी वर्षातील कार्याचा आराखडा, शाखा विस्तार, शताब्दी वर्षातील उपक्रम, प्रशिक्षण वर्ग आणि विविध सामाजिक विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. मार्च २०२६ नंतर देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ८३ संघ शिक्षा वर्ग आणि १२ कार्यकर्ता विकास वर्गांचा आढावा घेण्यात आला. या वर्गांमधून १८,८४२ स्वयंसेवकांना शाखा व्यवस्थापन, ग्रामीण विकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि समाजाभिमुख कार्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

सप्टेंबर महिन्यात देशभरात शाखा विस्तारासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा आढावा घेऊन उर्वरित उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. या माध्यमातून संपर्कात आलेल्या नागरिकांना समाजकार्य आणि ‘पंचविध परिवर्तन’ अभियानात सक्रिय सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या २०२६-२७ या वर्षातील देशव्यापी दौऱ्याच्या नियोजनावरही बैठकीत विचारमंथन करण्यात आले.

बैठकीत जनगणना, लोकसंख्याशास्त्रीय बदल, अमली पदार्थांचे वाढते व्यसन आणि त्याविरोधातील जनजागृती यांसारख्या राष्ट्रीय व सामाजिक विषयांवरही चर्चा झाली. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजनही करण्यात आले.

दरम्यान, श्री राम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील देणग्यांच्या मोजणीतील कथित अनियमिततेच्या प्रकरणावरही बैठकीत चर्चा झाली. या घटनेबाबत उपस्थितांनी दुःख व्यक्त करत तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार सुरू असलेली एसआयटी आणि पोलिसांची चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात आणि रामभक्तांचा मंदिरावरील विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *