Sunday , September 20 2026
Breaking News

सीसीटीव्हीच्या आधारे हिट-अँड-रन प्रकरणाचा छडा; टिप्पर चालक अटकेत

Spread the love

 

बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिट-अँड-रन अपघात प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे यशस्वी छडा लावत पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले आहे.

1 जुलै 2026 रोजी पहाटे 4.00 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान बेळगाव-गोकाक मार्गावरील मुचंडी गावाजवळील घसारी फळ विक्री केंद्रासमोर पायी जात असलेल्या राजू रामा अष्टेकर (वय 46, मूळ रा. चंदगड) यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला होता.

या प्रकरणी मृताच्या बहिणी लक्ष्मीबाई गंगाप्पा कुकडोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये केए-22/बी-1610 क्रमांकाचा हिरव्या रंगाचे इंजिन व लाल रंगाची बॉडी असलेला टिप्पर अपघातस्थळावरून गेल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान टिप्पर चालक अदृशप्पा गंगय्या मास्तमर्डी (मूळ रा. प्रभूनगर, ता. खानापूर, सध्या कणबर्गी) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने अपघात केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

यानंतर संबंधित टिप्परची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांवरून याच वाहनामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाले.

या गंभीर हिट-अँड-रन प्रकरणाचा तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे यशस्वी उलगडा केल्याबद्दल मारिहाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) तसेच एसीपी (ग्रामीण) यांनी विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *