Monday , September 21 2026
Breaking News

‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल’ नामाच्या गजरात येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रम दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

Spread the love

 

येळ्ळूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा अखंड गजर, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली आणि मुखात विठ्ठलाचे नामस्मरण… अशा अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात वैष्णव सदन आश्रम (येळ्ळूर-धामणे) ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचे आज सकाळी थाटात प्रस्थान झाले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सीमाभागातील शेकडो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी या दिंडीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
परंपरेप्रमाणे कै. ह. भ. प. श्री. कल्लाप्पा लक्ष्मण हुंदरे यांच्या घरापासून पालखीच्या पूजनाने दिंडीची सुरवात झाली, त्यानंतर पालखीचे पूजन आणि भव्य स्वागत पैलतीरी असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात आणि ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात पालखीचे व विणा-तुळशीचे पारंपरिक पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वैष्णव आश्रम येथे प. पू. गुरुवर्य तुकाराम महाराज मुरगोड यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पालखी सोहळा पुढे अवचारहट्टी, देवगणहट्टी आणि धामणे मार्गे मार्गस्थ झाला. दिंडीचा पहिला मुक्काम कलमेश्वर मंदिर जुने बेळगाव येथे होणार आहे. दिंडीच्या प्रस्थान प्रसंगी संपूर्ण येळ्ळूर परिसर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
यंदाच्या या पायी दिंडीमध्ये येळ्ळूर, धामणे, नागुर्डा, हलगा, मुतगा, देवगणहट्टी, अवचारहट्टी, जुने बेळगाव, वडगाव यांसह पंचक्रोशीतील शेकडो स्त्री-पुरुष वारकरी, तरुण आणि बाल गोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत आणि रांगोळ्या काढून पूजन करण्यात येत आहे.
शिस्तबद्ध नियोजन आणि मुक्काम
दिंडी समितीच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची, महाप्रसादाची आणि आरोग्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भजन, कीर्तन आणि रिंगण सोहळे करत ही दिंडी पुढील काही दिवसांत विविध टप्पे पार पाडत पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. सीमाभागातील वारकऱ्यांचा हा भक्तीचा सागर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *