Sunday , September 20 2026
Breaking News

2028 ची विधानसभा निवडणूक सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढणार; मंत्री सतीश जारकीहोळी यांची स्पष्ट भूमिका

Spread the love

 

बेळगाव : आगामी 2028 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढवेल, अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडली.

सोमवारी बेळगाव जिल्हा परिषद कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या यांना डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पुढील विधानसभा निवडणूक लढवेल. सध्या अहिंदा (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) नेतृत्वाबाबत कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नसून, या समाजघटकांचे अधिक प्रभावी संघटन करणे हेच पक्षाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कोणाला मंत्रीपद द्यायचे याचा अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. आगामी निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त फायदा होईल, अशा सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.

दूध दरवाढीच्या मागणीबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, यासंदर्भातील निर्णय संबंधित मंत्री आणि विभाग घेतील. सरकार परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी आवश्यक निर्णय करेल.

पावसाअभावी पिकांच्या नुकसानीबाबत त्यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात नागरिक आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. पेरणीची कामे पूर्ण झाली असून, पुढे वेळेवर पाऊस न झाल्यास तातडीने संयुक्त पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

अयोध्या राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले की, या प्रकरणाची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. मंदिरांमध्ये भाविकांकडून जमा होणारा निधी हा संबंधित मंदिरांच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *