Sunday , July 26 2026
Breaking News

यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबासह १३ रोपवे प्रकल्पांना गती द्या

Spread the love

 

मंत्री के. जे. जॉर्ज; अंजनाद्रीसह महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर भर

बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबासह प्रस्तावित १३ रोपवे प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री के. जे. जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रकल्पांना आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक मंजुरी तातडीने मिळवून त्यांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.

राज्यातील सर्व प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जॉर्ज यांनी अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे नियोजनाच्या टप्प्यातच अडकून असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. निविदा काढण्यापूर्वी वन, पर्यावरण तसेच अन्य संबंधित विभागांकडून आवश्यक मंजुरी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सर्व १३ रोपवे प्रकल्पांच्या व्यवहार्यता अभ्यासाची जबाबदारी राइट्स या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यापैकी आठ प्रकल्पांचे व्यवहार्यता अहवाल पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पांचे अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चिक्कमंगळुर येथील मुळ्ळय्यनगिरी रोपवे प्रकल्पाचा विशेष आढावा घेताना आवश्यक परवानग्या प्रलंबित असल्याने व्यवहार्यता अभ्यासाला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित परवानग्या तातडीने मिळवून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश राइट्सला देण्यात आले.

गोकाक धबधबा (बेळगाव), मैलार लिंगेश्वर मंदिर (यादगीर), अंजनाद्री टेकडी (कोप्पळ) आणि देवरगुड्डा मल्लतेश मंदिर (हावेरी) येथील रोपवे प्रकल्पांचे प्राथमिक व्यवहार्यता अहवाल पूर्ण झाले आहेत. गोकाक रोपवे प्रकल्पाला अर्थ विभागाची मंजुरी मिळाली असून, पुढील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जॉर्ज यांनी दिले.

हे सर्व प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागासह विविध केंद्रीय संस्थांकडील मंजुरी तातडीने मिळविण्यासाठी पर्यटन आयुक्तांनी नवी दिल्ली येथे संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

या रोपवे प्रकल्पांमुळे राज्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरण पर्यटन स्थळांपर्यंतची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. पर्यावरणपूरक वाहतूक, पर्यटकांचा अधिक चांगला अनुभव, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाधिष्ठित आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जॉर्ज यांनी व्यक्त केला.

१३ रोपवे प्रकल्प

प्रस्तावित रोपवे प्रकल्पांमध्ये मधुगिरी किल्ला (तुमकूर), मल्लल्ली धबधबा (कोडगू), अंजनाद्री टेकडी (कोप्पळ), बळ्ळारी किल्ला (बळ्ळारी), नृपतुंग टेकडी (धारवाड), यादगीर किल्ला, मैलार लिंगेश्वर मंदिर (यादगीर), होळ्ळम्मा मंदिर व कालकालेश्वर मंदिर (गदग), सौंदत्ती यल्लम्मा मंदिर (बेळगाव), देवरगुड्डा मल्लतेश मंदिर (हावेरी), गोकाक धबधबा (बेळगाव) आणि मुळ्ळय्यनगिरी शिखर (चिक्कमंगळुर) यांचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

परवानगीशिवाय खासगी कार्यक्रमांना हजेरी महागात; सरकारी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाचा इशारा

Spread the love  बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांतील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *