

१ कोटी ४२ लाख वसुल; विभक्त होण्याच्या मार्गावरील तीन जोडपी एकत्र
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील न्यायालय संकुलात या वर्षातील दुसऱ्या आयोजित महालोकअदालातिला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये वरिष्ठ,कनिष्ठ आणि अतिरिक्त न्यायालयाअंतर्गत १३३४ खटले मिटवण्यासाठी घेतले होते. त्यापैकी १०४२ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्यापोटी १ कोटी ४२ लाख ७९ हजार ९०८ रुपये १४ पैसे तडजोड रक्कम जमा झाली. यावेळी ८ हजार ९६१ दाखलपूर्व खटल्यापैकी ८ हजार ९३५ खटले निकाली काढण्यात आले. त्यापोटी ५३ लाख २८ हजार ८७४ रुपये तडजोडीची रक्कम वसुली झाली.
लोकअदालतीत घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या व मनाने दुभंगलेल्या एकूण तीन जोडप्यांचे मन परिवर्तन झाल्याने या जोडप्यांनी पुन्हा एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. या लोकअदालतीत दाखलपुर्व आणि वरिष्ठ स्तर, दिवाणी व अतिरिक्त न्यायालय येथील न्यायप्रविष्ट प्रकरणी तडजोडीने निकाली काढण्यासाठी घेतले होते. त्यामध्ये दाखलपूर्व खटल्यांची संख्या मोठी होती. मात्र वसुलीची रक्कमही कमी असल्याचे दिसून आले. या लोकअदालतीमुले न्यायालय परिसर पक्षकार, वकील व बॅंक अधिकारी, कर्मचारी व नागरिकामुळे गजबजुन गेला होता.
वरिष्ठस्तर न्यायालयातील एकुण १२५ खटले मिटवण्यासाठी घेतले होते. त्यापैकी १६ खटले निकाली निघाले. त्यापोटी ७५ लाख ८७ हजार १४० रुपये १४ पैसे रक्कम वसूल करण्यात आली. तर कनिष्ठ न्यायालयातील ५८३ खटले मिटवण्यासाठी घेतले होते. यातील ४९८ खटले निकाली काढण्यात आले. त्यापोटी ३४ लाख ८६ हजार ७६२ रुपये रक्कम वसूल झाली. तर अतिरीक्त न्यायालयातील मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या ६२६ पैकी ५२८ खटले निकाली काढण्यात आले. त्यातुन २८ लाख ६ हजार ६ रूपये रक्कम वसुली झाले.
यावेळी लोकअदालतीतील कामकाज वरिष्ठस्तर अरुण गुदगेणावर, कनिष्ठतर न्यायाधीश संतोषकुमार दैवज्ञ, अतिरीक्त न्यायाधीश दत्तकुमार जेवळकर यांच्यासह बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. वैराट, उपाध्यक्ष एम. ए. सनदी, सचिव निलेश हत्ती, सहाय्यक सचिव इमनगौडर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी आदींनी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मध्यस्थी केली.

Belgaum Varta Belgaum Varta