Sunday , September 20 2026
Breaking News

नो बॅग डे’मध्ये अमली पदार्थांविरोधी जनजागृती; तिसऱ्या शनिवारी शाळांमध्ये विशेष उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार कमी करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबविण्यात येतो. जुलै महिन्यातील या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

शनिवार, १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘नो बॅग डे’मध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाऐवजी सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या दिवशी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार हा उपक्रम राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणे आणि जबाबदार नागरिक घडविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

‘नो बॅग डे’च्या माध्यमातून दर महिन्याला एका सामाजिक विषयाची निवड करून त्यावर जनजागृती केली जाते. रस्ता सुरक्षा, निरोगी जीवनशैली, इंटरनेटचा वाढता वापर, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन तसेच इतर सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो.

भावी पिढीला व्यसनमुक्त आणि सुदृढ समाजाची जाणीव करून देण्यासाठी शालेय वयातच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या जुलै महिन्यातील ‘नो बॅग डे’मध्ये अमली पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध आणि त्याविषयी जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *