Monday , September 21 2026
Breaking News

युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : आरोपींवर गुंडा ॲक्ट

Spread the love

 

बेळगाव : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथे झालेल्या थरारक गोळीबाराच्या प्रयत्नानंतर बेळगाव शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुंडा ॲक्ट तसेच तडीपारी (हद्दपारी) सारखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी रात्री युनियन जिमखाना क्लबमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या प्रयत्नाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींचा माग काढण्यासाठी शहर पोलिसांनी दोन विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन केली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि चंदगड परिसरात छापेमारी करत आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, आर्थिक व्यवहार आणि हल्ल्यामागील नेमका हेतू याचा सर्वंकष तपास सुरू आहे.

या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा जलगार गल्ली येथील रहिवासी सुरेश जळगार यांच्या तक्रारीवरून प्रफुल पाटील आणि त्याच्या चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा गुन्हा युनियन जिमखानाच्या व्यवस्थापकांनी दाखल केला असून, आरोपींनी बेकायदेशीरपणे क्लबमध्ये घुसून मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री आरोपींचा गट युनियन जिमखानामध्ये घुसला आणि “सुरेश जळगार कुठे आहेत?” अशी विचारणा करू लागला. आरोपींपैकी एकाच्या मोबाईलमध्ये सुरेश जळगार यांचा फोटो असल्याचेही समोर आले आहे. त्याच फोटोच्या आधारे ओळख पटवून आरोपींनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जिमखान्यात एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी उपस्थित नागरिकांनी अक्षरशः धावाधाव केली. या गोंधळाचा फायदा घेत सुरेश जळगार यांनी तेथून सुटका करून थेट कॅम्प पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *