Sunday , July 26 2026
Breaking News

कोका प्रकरणातील साक्षीदाराची निर्घृण हत्या

Spread the love

 

 

हिडकल धरणाजवळ तलवारीने सपासप वार, १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा

बेळगाव : कोका प्रकरणातील साक्षीदार असलेल्या एका युवकाची हिडकल धरण परिसरात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आणखी एक युवक जखमी झाला असून, या प्रकरणी १० ते ११ जणांविरुद्ध गोकाक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बुधवारी ही माहिती दिली.

माणिकवाडी (ता. गोकाक) येथील पास्कल हृदयराज मुत्तुस्वामी (वय ३१) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर करण सुभाष मिळवंकी (वय २५) हा हल्ल्यात जखमी झाला आहे. करण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंगप्पा नाईक, राहुल नागेश नाईक, प्रज्वल यांच्यासह १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १४ जुलै रोजी दुपारी करण, पास्कल मुत्तुस्वामी, मल्लेश कोलकार आणि सतीश हेळवी हे मित्र हिडकल धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. व्ह्यू पॉइंट पाहिल्यानंतर ते धरणाजवळील फुटपाथलगत एका झाडाखाली बसले होते. सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाचच्या दरम्यान ते परत जाण्याच्या तयारीत असताना एका ऑटोरिक्षा आणि दोन दुचाक्यांवरून आलेल्या सशस्त्र टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

हल्लेखोरांपैकी पाच ते सहा जणांच्या हातात तलवारी होत्या. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने घाबरलेल्या युवकांनी डोंगराच्या दिशेने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी आरोपींपैकी एकाने फेकलेला दगड करण यांच्या डोक्याला लागून ते जखमी झाले. दरम्यान, पास्कल यांचा तोल जाऊन ते खाली पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने सपासप वार करत जागीच त्यांची हत्या केली.

पास्कल मुत्तुस्वामी हे गोकाक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कोका (KCOCA) प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार होते. त्याच पूर्ववैमनस्यातून आणि साक्षीदार असल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

या खळबळजनक हत्येचा तपास गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एम. के. मराठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आणि त्यांच्या पथकाकडून सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *