

बेळगाव : नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देत पोलीस आणि जनतेतील विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी ‘घरोघरी पोलीस’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत आपत्कालीन सेवांचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक असलेले स्टिकर घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे आपत्ती, गुन्हा किंवा आणीबाणीच्या प्रसंगी आवश्यक क्रमांक शोधण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ थांबणार असून, एका नजरेत सर्व महत्त्वाचे संपर्क उपलब्ध होणार आहेत.
शहरातील वाढती गुन्हेगारी, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना पोलिसांशी तसेच इतर अत्यावश्यक सेवांशी तात्काळ संपर्क साधता यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रत्येक स्टिकरवर 112 हा एकात्मिक आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, 1930 हा सायबर आर्थिक फसवणूक प्रतिबंधक हेल्पलाइन क्रमांक, संबंधित पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक, बीट पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांचे संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. याशिवाय महिला सुरक्षा, नागरिक सहाय्य, स्थानिक पोलीस व्यवस्था आणि महत्त्वाच्या सेवा यांची उपयुक्त माहितीही देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ स्टिकर लावण्यापुरता मर्यादित नाही. घराघरात पोहोचणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील सुरक्षा, संशयास्पद हालचाली, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, महिलांची सुरक्षा आणि सामाजिक सहभाग याबाबत जनजागृती करत आहेत. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होत आहे.
शहर सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांचे ‘डोळे आणि कान’ बनावे, कोणतीही संशयास्पद हालचाल, अनोळखी व्यक्ती किंवा सायबर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘घरोघरी पोलीस’ हा उपक्रम केवळ आपत्कालीन संपर्क उपलब्ध करून देणारा नसून, ‘विश्वास, संवाद आणि सुरक्षितता’ या त्रिसूत्रीवर आधारित लोकाभिमुख पोलिसिंगचे प्रभावी पाऊल ठरत असून, सुरक्षित आणि सतर्क बेळगाव घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta