Sunday , September 20 2026
Breaking News

बेकायदेशीर जुगार, बेटिंगवर पोलिसांचा वॉच; क्लब, रमी क्लब व जिमखान्यांची विशेष तपासणी

Spread the love

 

 

बेळगाव : शहरात बेकायदेशीर जुगार, बेटिंग तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलीस विभागाने क्लब, रमी क्लब, जिमखाने आणि इतर मनोरंजन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील अशा संस्थांची तपासणी करून दहा दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या मोहिमेदरम्यान संबंधित क्लब आवश्यक परवाने घेऊन कायदेशीररीत्या कार्यरत आहेत का, तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते का, याची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. विशेषतः रमी किंवा पत्त्यांचे खेळ सुरू असलेल्या क्लबना न्यायालयाच्या निर्देशांनुसार लागू असलेल्या सर्व अटींचे लेखी पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची लेखी पोहोचही घेतली जाणार आहे.

कायदेशीररित्या सुरू असलेल्या क्लबना कोणताही त्रास होणार नाही, मात्र बेकायदेशीर जुगार आणि बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.

पोलीस विभागाने घालून दिलेल्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे आहेत :

प्रवेशद्वार आणि खेळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य.

सीसीटीव्हीचे किमान 15 दिवसांचे फुटेज जतन करून पोलिसांनी मागणी केल्यास त्वरित उपलब्ध करून देणे.

प्रत्येक सदस्याला अधिकृत ओळखपत्र देणे.

सदस्य नसलेल्या व्यक्ती किंवा पाहुण्यांना खेळात सहभागी होऊ न देणे.

पैशांची पैज, बेटिंग, जुगार किंवा कोणत्याही बेकायदेशीर खेळांना सक्त मनाई.

पोलीस तपासणी व देखरेखीस पूर्ण सहकार्य करणे.

——————————————————————–
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शहरातील बेकायदेशीर जुगार व बेटिंगच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *