


ग्रोधन एलएलपी आणि सिटी इंडेक्सच्या व्यवहारांची चौकशी; कोट्यवधींच्या गुंतवणुकीची तपासणी
बेळगाव : जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केल्याच्या संशयावरून बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर गुंतवणूक संस्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटलनंतर शुक्रवारी ग्रोधन एलएलपी आणि सिटी इंडेक्स या दोन खासगी गुंतवणूक कंपन्यांच्या कार्यालयांवर संयुक्त पथकाने छापे टाकून कागदपत्रांची सखोल तपासणी केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने टिळकवाडी येथील ग्रोधन एलएलपी तसेच महात्मा फुले रोडवरील सिटी इंडेक्सच्या कार्यालयांवर एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईदरम्यान कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांची नोंद, करारपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे रात्री उशिरापर्यंत तपासण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
प्राथमिक चौकशीत दोन्ही कंपन्यांनी नागरिकांना दरमहा ४ ते ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उभारल्याचे समोर आले आहे.
उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोधन एलएलपीने सुमारे १,१०० गुंतवणूकदारांकडून ३८ कोटी रुपये जमा केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. अनेकांनी खासगी कर्ज काढून या संस्थेत गुंतवणूक केल्याची बाबही उघड झाली आहे.
तर सिटी इंडेक्सकडे सुमारे १,५०० गुंतवणूकदारांनी ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कंपनीने डिबेंचरच्या माध्यमातून निधी उभारल्याची माहिती कागदपत्रांमधून समोर आली आहे. कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या व्यवहारांची कायदेशीरता आणि आर्थिक उलाढालीची सखोल चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्रोधन एलएलपीचा प्राथमिक तपास अहवाल शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून, सिटी इंडेक्सची तपासणीही पुढे सुरू राहणार आहे. संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे श्रवणकुमार नाईक यांनी सांगितले.
नागरिकांच्या पैशांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्यांत संबंधित प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या संशयित गुंतवणूक संस्थांविरोधात बेळगाव जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा संस्थांवर पुढेही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta