Sunday , September 20 2026
Breaking News

सोन्याच्या दुकानातील चोरीचे नाट्य उघड; फिर्यादीच निघाला चोर, ६५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : शहरातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेरणेकर अँड सन्स या सराफा दुकानात झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्यानेच चोरीचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील रहिवासी कृष्णानंद विश्वनाथ वेरणेकर यांनी १७ जुलै रोजी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा दावा त्यांनी केला होता.

खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक पुरावे आणि अन्य माहितीची पडताळणी केली असता संशय थेट फिर्यादीवरच गेला. चौकशीदरम्यान कृष्णानंद वेरणेकर यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम स्वतःच काढून आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीच्या डिकीत ठेवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून ₹४५ हजार किमतीची अ‍ॅक्टिव्हा, ₹६२.६० लाख किमतीचे ५१९.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ₹६ हजार किमतीचे ३१ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ₹२.८३ लाखांची रोख रक्कम असा एकूण ₹६५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात फिर्यादीच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. तसेच हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या खडेबाजार पोलीस पथकाचे त्यांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *