Sunday , September 20 2026
Breaking News

भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा; मुख्य संशयित अटकेत, साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी गावात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचे ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

चिवटगुंडी येथील रहिवासी महांतेश बसप्पा बोगूर (वय २९) हे १२ जुलै २०२६ रोजी कुटुंबासह घराला कुलूप लावून शेतात सोयाबीन पिकावर औषध फवारणीसाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील तिजोरीत ठेवलेले ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ४८ हजार रुपयांची रोकड असा एकूण जवळपास ५.९७ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू करत बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि बैलहोंगल उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सी. यलगार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकातील पीएसआय बसवराज जालापूर, एएसआय के. आर. इमानवर, तांत्रिक कर्मचारी सचिन पाटील आणि सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला.

या प्रकरणी प्रकाश रायप्पा मुल्ला (वय ४०, रा. चिवटगुंडी, ता. बैलहोंगल) याला १६ जुलै रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीतील संपूर्ण ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्याला न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावत मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस प्रशासनाने कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *