Sunday , September 20 2026
Breaking News

चिखली येथील कुमार विद्यामंदिर आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ते बळ मिळावे या उद्देशाने कागल येथील तुषार भास्कर संस्थापित आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे चिखली येथील कुमार विद्यामंदिर मधील २० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थापक तुषार भास्कर यांनी, तेरा वर्षांपूर्वी स्थापन झालेली आपुलकी सेवाभावी संस्था समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. स्वतः कोल्हापूर येथील औद्योगिक संस्थेत कामगार म्हणून कार्य करत असतानाही समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून संस्थेची स्थापना करण्यात आली. संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांवर विश्वास ठेवून होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. गेल्या तेरा वर्षांत संस्थेने २५ हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला आहे.
साताप्पा कांबळे यांनी, कोरोना महामारीच्या कठीण काळात तुषार भास्कर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने कागल येथील कोविड केंद्रावर फळे, अंडी व अन्य आवश्यक साहित्याचे वितरण केले. मुगळी येथील मुलीला रशियात शिक्षणासाठी प्रती वर्षी रुपये पन्नास हजाराप्रमाणे शिष्यवृत्ती देऊन एम बी बी एस पूर्ण केले. संकटाच्या काळात गरजूंना मदतीचा हात देत संस्थेने समाजात विश्वास निर्माण केला असून या कार्यात तुषार भास्कर यांचा सिंहाचा वाटा आहे.
पर्यावरण प्रेमी शिक्षण नामदेवू चौगुले यांनी, आपुलकी सेवाभावी संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काटकर, सदस्य समीर नाईक व तानाजी परमणे यांच्या हस्ते तुषार भास्कर, साताप्पा कांबळे, इम्रान खलिफ, सुनील कारंजे व अरविंद कांबळे यांचा रोपे देऊन पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापिका शहिनाज सय्यद, सूर्यकांत पाटील, ज्योती जिरगे, कौसर पठाण शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संजय खुडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *