


खानापूर : लक्ष्मी यात्रेनिमित्त मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या हलशी ते हलशीवाडी या रस्त्याची ठिकठिकाणी अवघ्या तीन महिन्यांतच दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी हायस्कूल ते हलशीवाडी पर्यंतच्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडून निघाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संबंधित कंत्राटदाराने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हलशीवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
हलशी ते गुंडपी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता अनेक वर्षे टिकाऊ राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, यंदाच्या सुरुवातीच्या पावसातच रस्त्याचा निकृष्ट दर्जा उघड झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात असून अनेक ठिकाणी ती रस्त्यावरच विखुरलेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी सायकलवरून या मार्गाने ये-जा करतात. रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे सायकली आणि दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढत असून अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वेळेत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नाही तर पुढील पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने याची दखल घेऊन कंत्राटदाराला आवश्यक दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि दर्जेदार पद्धतीने डागडुजी करण्यात यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल तसेच रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा हलशीवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta