Saturday , August 8 2026
Breaking News

व्यसन, मोबाईलपासून दूर राहा : वैदेही जाधव

Spread the love

 

हुंचेनहट्टी, किणयेत स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम

बेळगाव : सध्याच्या काळात तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच मोबाईलचा आवश्यक आणि मर्यादित वापर करावा, असे आवाहन प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी केले.

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना, बेळगाव योजना कार्यालयाच्या वतीने हुंचेनहट्टी येथील मराठी प्राथमिक सरकारी शाळा आणि किणये येथील मराठा मंडळ हायस्कूल येथे ‘स्वास्थ्य संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना वैदेही जाधव यांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. व्यसनांच्या आहारी गेल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यासोबतच शिक्षण, कुटुंब आणि भविष्यातील प्रगतीवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून कायम दूर राहण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला असला तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर विपरीत परिणाम करू शकतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रता कमी होणे, अभ्यासात व्यत्यय येणे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईलचा विवेकपूर्ण आणि मर्यादित वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. वड्डेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी, श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्या विभागीय पर्यवेक्षिका विशालाक्षी, कार्यक्षेत्र सेवा प्रतिनिधी पद्मश्री जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दहशत निर्माण करून फरार झालेल्या रौडीशीटरला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love  बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि दबाव टाकून फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *