Monday , September 21 2026
Breaking News

अतिथी शिक्षकांवरच सरकारी शाळांचा गाडा; राज्यात आणखी ६,६१७ पदांना मंजुरी

Spread the love

 

बेळगावला १३५ अतिरिक्त अतिथी शिक्षक

बेळगाव : राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अतिथी शिक्षक नियुक्तीचा दुसरा टप्पा सुरू करत आणखी ६,६१७ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात राज्यभरात मंजूर झालेल्या अतिथी शिक्षकांची संख्या ३६,९४४ वर पोहोचली असून, नियमित शिक्षक भरती होईपर्यंत सरकारी शाळांचा शैक्षणिक गाडा प्रामुख्याने अतिथी शिक्षकांच्या भरोशावरच धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारने यापूर्वी राज्यातील रिक्त शिक्षक पदांच्या पार्श्वभूमीवर ४० हजार अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३०,३३७ पदांसाठी जिल्हानिहाय नियुक्तींना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागण्या, विद्यार्थीसंख्येतील वाढ आणि शाळांची गरज लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित ९,६६३ पदांपैकी ६,६१७ पदांचे वाटप करण्यात आले आहे.

नियमित शिक्षकांची भरती पूर्ण होईपर्यंत अथवा मार्च २०२७ पर्यंत, यापैकी जी बाब आधी घडेल तोपर्यंत अतिथी शिक्षकांची नियुक्ती कायम राहणार आहे.

बेळगावला आणखी १३५ शिक्षकांचा दिलासा

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात १,३४९ अतिथी शिक्षकांची पदे मंजूर झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात १३५ अतिरिक्त पदांना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील एकूण मंजूर अतिथी शिक्षकांची संख्या १,४८४ वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकविहीन किंवा अपुऱ्या शिक्षकसंख्येवर चालणाऱ्या शाळांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मात्र, राज्यातील हजारो नियमित शिक्षकांची पदे अद्याप रिक्त असल्याने सरकारी शाळांमधील अध्यापनाची संपूर्ण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अतिथी शिक्षकांवरच अवलंबून असल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नियमित भरतीला गती मिळेपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची जबाबदारी आता या अतिथी शिक्षकांच्या खांद्यावरच राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *