Sunday , September 20 2026
Breaking News

आराम बसमधून व्यापाऱ्याची ३३ लाखांची रोकड लंपास; टोलनाक्यावर उतरले संशयित, सीसीटीव्हीत कैद

Spread the love

 

पुण्यात भुईमुगाच्या शेंगा विकून परतताना घडला प्रकार; हत्तरगी टोलनाक्याजवळ बॅग गायब

पुण्यात भुईमुगाच्या शेंगा विकून मिळालेली तब्बल ३३ लाख रुपयांची रोकड घेऊन खासगी आराम बसमधून गावी परतणाऱ्या व्यापाऱ्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्याची रोकड असलेली बॅग अज्ञातांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली असून, रोकड घेऊन पसार झालेल्या दोघा संशयितांची छबी हत्तरगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथील श्री वीरभद्रेश्वर ट्रेडर्स कंपनीचे अधिकारी शिवकुमार स्वामी हे भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी पुण्याला गेले होते. विक्रीतून मिळालेली ३३ लाख रुपयांची रोकड बॅगेत ठेवून ते मंगळवारी (२१ जुलै) रात्री खासगी आराम बसने गावी परतत होते.

मध्यरात्री सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान बस हत्तरगी टोलनाक्याजवळ पोहोचली. यावेळी दोन प्रवासी बसमधून उतरले. त्यानंतर काही वेळातच शिवकुमार स्वामी यांनी आपली रोकड असलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. रस्त्यावर बस थांबविणे धोकादायक असल्याने चालकाने बस थेट मध्यवर्ती बसस्थानकात नेली.

यानंतर शिवकुमार स्वामी यांनी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र घटना यमकनमर्डी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, प्रकार उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा काकती पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान हत्तरगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित बॅग घेऊन बसमधून खाली उतरतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसून आले आहे. हे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *