Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त; ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील (BDFA) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने (KSFA) विद्यमान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त करून हंगामी समितीची नियुक्ती केली असून, पुढील ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या व्यवस्थापन मंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बेळगाव येथे झालेल्या बैठकीत राज्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अँथोनी यांनी विद्यमान अध्यक्ष पंढरी परब आणि संलग्न क्लबच्या प्रतिनिधींना बरखास्तीचे पत्र सुपूर्द केले.

राज्य संघटनेने राम हदगल यांची हंगामी अध्यक्ष, राजेश जाधव यांची सचिव आणि लेस्टर डिसोजा यांची खजिनदार म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांनी संघटनेची सर्व कागदपत्रे, बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचा ताबा तातडीने नव्या समितीकडे सुपूर्द करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य संघटनेचे सचिव एम. कुमार यांनी पुढील ६० दिवसांत लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. नव्याने निवडून येणाऱ्या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२७ पर्यंत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. इलेव्हन स्टार क्लबची मालकी पंढरी परब यांच्याकडून काढून मूळ मालक हमीदशेठ यांच्याकडे परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, बीडीएफएचे युनियन बँकेतील खाते गोठविण्याचे आदेश देण्यात आले असून, सर्व आर्थिक व्यवहार हंगामी समितीच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील प्रशासकीय अनिश्चितता दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांनंतर संघटनेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा फुटबॉल वर्तुळातून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सीमालढा अधिक तीव्र होणार! न्यायालयासह राजकीय पातळीवर मध्यवर्ती म. ए. समितीची रणनीती

Spread the love    सीमा समन्वय मंत्र्यांची लवकरच भेट; सुनावणीला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *