Sunday , September 20 2026
Breaking News

काँग्रेस अध्यक्षपद निवड प्रक्रियेत पुन्हा वाद; बेळगाव काँग्रेस कार्यालयात शाब्दिक चकमक

Spread the love

 

बेळगाव : महानगर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी पुन्हा गटबाजी उफाळून आली. विविध गटांच्या नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या दोन दिवसांपासून अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) नियुक्त निरीक्षकांकडून महानगर काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करावी, यावरून पक्षातील विविध गटांमध्ये मतभेद कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

बैठकीदरम्यान फहीम नायकवाडी आणि महापालिका सदस्य अजीम पटवेगार यांनी आपल्या-आपल्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविताना एकमेकांशी जोरदार शाब्दिक चकमक केली. हा वाद वाढल्याने काही काळ काँग्रेस कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या नेत्यांची समजूत काढली. पक्षहित लक्षात घेऊन सर्वांनी शांत राहावे आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितल्यानंतर वातावरण निवळले.

महानगर काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा गटबाजी उघड झाल्याने बेळगाव काँग्रेसमध्ये या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठी अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवणार, याबाबत कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्सुकता आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *