Sunday , September 20 2026
Breaking News

घराच्या उंबरठ्यावरच सोनसाखळीवर डल्ला; प्रसंगावधानामुळे अर्धे गंठण वाचले

Spread the love

 

बेळगाव : शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, गावावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी रात्री टिळकवाडीतील हिंदूनगर परिसरात घडली. महिलेने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण गंठण चोरट्यांच्या हाती न लागता त्यातील काही भाग वाचला.

माहितीनुसार, जयश्री (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. रविवारी रात्री त्या बेळगाव बसस्थानकातून आपली होंडा ॲक्टिव्हा घेऊन हिंदूनगर येथील निवासस्थानी परतत होत्या. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घराजवळ पोहोचताच मागून भरधाव आलेल्या मोटारसायकलस्वार भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणावर झडप घालत ते हिसकावण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने महिलेच्या गळ्याला जोराचा हिसका बसला. मात्र, त्यांनी धैर्य न गमावता गंठण घट्ट पकडून ठेवल्याने चोरट्यांना संपूर्ण गंठण लंपास करता आले नाही. झटापटीदरम्यान सुमारे २० ग्रॅम सोन्याचा तुकडा भामटे घेऊन पसार झाले, तर १० ग्रॅमचा भाग महिलेच्या हातात राहिला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, रात्री उशिरा टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात पुन्हा साखळीचोर सक्रिय झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, विशेषतः एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *