Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटकात युवकांमधील एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे

Spread the love

 

 

बेंगळुरू : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार देशातील एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटकाचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात विशेषतः युवकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांची एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एचआयव्ही संसर्गाचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करून बाधितांना लवकर उपचार उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. राज्यात सुमारे २.६० लाख नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत असून, त्यापैकी सुमारे २.५० लाख नागरिक अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) उपचार घेत आहेत. मात्र, जवळपास ५४ हजार नागरिकांना आपण एचआयव्ही संक्रमित असल्याची माहिती नसल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

एचआयव्ही बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण लक्षणीय असून, विशेषतः १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या वयोगटातील युवकांमध्ये एचआयव्हीबाबत योग्य माहिती आणि जागृती निर्माण करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्हा एड्स नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये व्यापक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये एचआयव्ही संसर्गाबाबत जनजागृती, समुपदेशन तसेच मोफत एचआयव्ही तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयीन व्यवस्थापनाने या मोहिमेला सहकार्य करून एचआयव्ही प्रतिबंध आणि जनजागृतीच्या प्रयत्नांना बळ द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *