Sunday , September 20 2026
Breaking News

मीटरनुसारच धावणार शहरातील ऑटो रिक्षा; 15 दिवसांत नियमांची कडक अंमलबजावणी

Spread the love

 

बेळगाव : शहरातील ऑटो रिक्षा सेवा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व ऑटो रिक्षा पुढील 15 दिवसांच्या आत अनिवार्यपणे मीटरनुसार चालविण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी 37 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 15 रुपये इतके भाडे आकारण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबंधित ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील सर्व ऑटो रिक्षांमध्ये कार्यरत मीटर असणे बंधनकारक असून, मीटरप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारले जावे, यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवावी, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

यासोबतच ऑटो रिक्षा चालकांनी प्रवाशांशी नम्रतेने वागावे, अवाजवी भाडे आकारू नये आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

यापूर्वी सुमारे आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीतही मीटर सक्तीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक चालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आता नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *