


बेळगाव : मराठी भाषेतील फलकांच्या वापराबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून, संबंधित विभागांना शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
समितीने ३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यातील शासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दर्शनी फलकांवर पूर्वीप्रमाणे मराठी भाषेचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
याशिवाय काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून खासगी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही मागणी समितीने केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालकांना पत्र पाठवून या प्रकरणाची तपासणी करून शासनाच्या परिपत्रकानुसार व प्रचलित नियमांनुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीलाही देण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने अधिकृतपणे दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता प्रशासनाकडून पुढील काळात नेमकी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta