


बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडेकोळ मठाजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे घसरड्या झालेल्या रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने एक मालवाहू ट्रक पलटी झाला. या अपघातामुळे पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पलटी झालेला ट्रक हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सततच्या पावसामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे, बडेकोळ मठ परिसरात गेल्या आठवडाभरात तब्बल सहा रस्ते अपघात घडले आहेत. त्यामुळे हा परिसर ‘डेंजर झोन’ बनल्याची चर्चा असून, येथे तातडीने बॅरिकेड्स, इशारा फलक, वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta