


बेळगाव : दारूच्या नशेत रोज घरी येऊन पत्नी आणि मुलांशी भांडण, मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा अखेर स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या हातूनच दुर्दैवी अंत झाला. उद्यमबाग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून उद्यमबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव बाळाप्पा नागाप्पा तळवार (वय ४५, रा. उद्यमबाग) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाप्पा तळवार हे दररोज मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन पत्नी व मुलांशी वाद घालत होते. गुरुवारी रात्रीही घरात जोरदार भांडण झाले. या सततच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने मध्यरात्रीनंतर हॉलमध्ये झोपलेल्या वडिलांवर फावड्याने सपासप वार केले.
डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या जबर मारहाणीत बाळाप्पा तळवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घरातील आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश होस्पेट यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कौटुंबिक कलह आणि दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाची झालेली ही शोकांतिका परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उद्यमबाग पोलीस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta