


बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात असताना, डॉक्टरांची अपॉइंटमेंट देण्याच्या बहाण्याने रायबाग तालुक्यातील एका शिक्षकाची पाच लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक आपल्या मुलाच्या डोळ्यांच्या उपचारासाठी बेंगळुरू येथील एका नेत्रालयाचा संपर्क क्रमांक गुगलवर शोधत होते. गुगलवर मिळालेल्या एका मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने स्वतःला रुग्णालयाशी संबंधित असल्याचे भासवत व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली.
“डॉक्टरांची अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी ही लिंक उघडा आणि आवश्यक माहिती भरा,” असे सांगण्यात आले. शिक्षकांनी लिंक उघडली; मात्र त्यामध्ये कोणतीही माहिती दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
घटनेनंतर एक-दोन दिवसांनी त्यांच्या बँक खात्यातून पाच लाखांहून अधिक रक्कम परस्पर काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ जिल्हा सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुगलवर मिळणाऱ्या अनोळखी क्रमांकांवर विश्वास ठेवू नये तसेच व्हॉट्सअॅपवर प्राप्त होणाऱ्या लिंक किंवा एपीके फाईल उघडताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta