Monday , August 17 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या केशरचनेवर शिक्षण विभागाची शिस्त; मलेट, स्पायकीसह फॅशनेबल हेअरकटवर निर्बंध

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी, या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या केशरचनेसंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच जारी होणार आहे.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये विविध आधुनिक आणि आकर्षक हेअरस्टाईलची वाढती क्रेझ पाहायला मिळत आहे. मलेट कट, स्पायकी हेअरस्टाईल, केसांमध्ये रेषा किंवा डिझाईन काढणे, केसांना विविध रंग लावणे तसेच इतर अनैसर्गिक आणि अतिफॅशनेबल हेअरकट करून विद्यार्थी शाळेत येत असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शाळांमधील शिस्तीचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे लक्ष शिक्षणाकडे केंद्रित राहावे, या हेतूने साधी, स्वच्छ आणि शिस्तबद्ध केशरचना अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांचे केस स्वच्छ, नीटनेटके आणि व्यवस्थित कापलेले असावेत. कान व मानेवर वाढलेले केस ठेवू नयेत. केसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रेषा किंवा डिझाईन्स काढणे, मलेट किंवा स्पायकी शैलीचा अवलंब करणे, केसांना रंग लावणे तसेच अतिफॅशनेबल किंवा अनैसर्गिक हेअरकट ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही.

केवळ केशरचनेवरच नव्हे, तर स्वच्छ गणवेश परिधान करणे, शाळेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, शिस्तप्रिय वर्तन ठेवणे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे, या बाबींवरही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.

‘आजची शिस्त म्हणजे उद्याच्या जबाबदार आणि यशस्वी नागरिकांची पायाभरणी’ या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी लवकरच राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *