


जायंट्स मेनच्या वतीने व्याख्यान
बेळगाव : जळीत रुग्णांसाठी त्वचादान हे खऱ्या अर्थाने जीवनदान असून, अवयवदान आणि त्वचादानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून प्रत्येक नागरिकाने या पवित्र कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रभावी प्रतिपादन केएलई रोटरी स्किन बँकेचे संचालक, प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश एस. पोवार यांनी केले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांव मेनच्या वतीने जायंट्स भवन, कपिलेश्वर रोड येथील कै.तात्या पवार सभागृहात आयोजित “त्वचादान – गरज, महत्त्व आणि जनजागृती” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, प्रमुख व्याख्याते डॉ. राजेश पोवार, जायंट्स आय फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे तसेच फेडरेशनचे संचालक सुनील मुतगेकर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते डॉ. राजेश पोवार यांचा शाल, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉ सागर काटकर, डॉ मनोज एच आर, त्वचापेढी प्रमुख
अश्विनी इंगळे यांचाही गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील जनजागृतीचा उद्देश स्पष्ट केला.
आपल्या व्याख्यानात डॉ. पोवार यांनी भारतातील अवयवदानाची सद्यस्थिती मांडताना सांगितले की, अवयवदानाच्या बाबतीत भारत अजूनही विकसित देशांच्या तुलनेत खूपच मागे आहे. भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते; मात्र त्यापैकी पाच टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना आवश्यक अवयव उपलब्ध होतात. भारतातील अवयवदानाचे प्रमाण केवळ ०.०८ दाते प्रति दहा लाख लोकसंख्या इतके असून, स्पेनमध्ये हे प्रमाण ३५, अमेरिकेत २६, तर ब्रिटनमध्ये २७ इतके आहे. त्यामुळे भारतात अवयवदान व त्वचादानाबाबत व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असून तो शरीराचे संरक्षण करणारा नैसर्गिक कवच असल्याचे सांगितले. गंभीर भाजलेल्या रुग्णांमध्ये त्वचेचे संरक्षण नष्ट झाल्यास संसर्ग, शरीरातील पाण्याची कमतरता व इतर गुंतागुंत निर्माण होऊन जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी त्वचादानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होते. त्वचादानामुळे संसर्ग कमी होतो, उपचाराचा खर्च व रुग्णालयातील मुक्काम कमी होतो तसेच रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे दहा लाख मध्यम ते गंभीर भाजलेल्या रुग्णांची नोंद होत असून त्यामध्ये महिला व लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्वचादानाची गरज दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्वचादानाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत त्वचा संकलित केली जाते. ही प्रक्रिया अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होते. त्वचा फक्त पाय, मांड्या व पाठीवरील वरचा पातळ थर घेतला जात असल्याने शरीर विद्रूप होत नाही, रक्तस्राव होत नाही आणि अंत्यदर्शन तसेच धार्मिक विधींमध्ये कोणताही अडथळा येत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
त्वचादानासाठी पूर्वनोंदणी किंवा प्रतिज्ञापत्र आवश्यक नसून मृत्यूनंतर नातेवाईकांनी संमती दिल्यास त्वचादान करता येते. त्वचा संकलित केल्यानंतर तिच्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करून स्किन बँकेत सुरक्षित ठेवली जाते आणि गरजेनुसार जळीत रुग्णांवर प्रत्यारोपित केली जाते. यासाठी रक्तगट किंवा इतर कोणतीही जुळवणी आवश्यक नसते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जायंट्स आय फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे यांनी आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेल्या त्वचादान उपक्रमांची माहिती दिली. भविष्यात जायंट्सच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्था तसेच ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक नागरिकांना त्वचादानासाठी प्रेरित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
व्याख्यानानंतर उपस्थितांनी त्वचादानासंदर्भातील धार्मिक, सामाजिक व वैद्यकीय शंका, समज-गैरसमज याविषयी अनेक प्रश्न विचारले. डॉ. राजेश पोवार यांनी प्रत्येक प्रश्नाचे शास्त्रीय पद्धतीने समाधानकारक उत्तर देत सर्व शंकांचे निरसन केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये त्वचादानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुंडलिक पावशे यांनी केले. यावेळी जायंट्स मेनचे पदाधिकारी, जायंट्स आय फाऊंडेशनचे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मृत्यूनंतरही दुसऱ्याला नवजीवन देण्याची संधी प्रत्येकाला मिळू शकते. त्वचादान हा मानवतेचा सर्वोच्च संदेश असून प्रत्येक कुटुंबाने त्वचादानाबाबत जागरूक होऊन समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta