Sunday , August 16 2026
Breaking News

युवा शक्ती हीच भारताच्या विकासाची खरी ताकद

Spread the love

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी; म्हैसूरात स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन

बंगळूर : भारत आज विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून त्यामागे देशातील युवकांची मोठी भूमिका आहे. युवक सर्वच क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत आणि हीच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

म्हैसूर येथील नारायण शास्त्री रोडवरील रामकृष्ण आश्रमाने उभारलेल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र आणि विवेक स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आश्रमाच्या शाळेच्या परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “कोणत्याही देशातील युवकांना योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि मोठी स्वप्ने पाहून ती आपल्या मातृभूमीतच साकार करण्याचा आत्मविश्वास मिळाला, तर त्यांची क्षमता राष्ट्रीय शक्तीत रूपांतरित होते. या प्रक्रियेत शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”

ते पुढे म्हणाले की, देशातील शिक्षण संस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या भारतात सुमारे १,४०,००० एमबीबीएस जागा उपलब्ध असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८२३ पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) हे २१व्या शतकातील भारताच्या युवा पिढीला सक्षम बनविणारे प्रभावी माध्यम ठरत आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारतातील युवक आज खासगी रॉकेट प्रक्षेपणापासून डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप्स, मुद्रा योजनेतून उद्योजकता, आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपर्यंत विविध क्षेत्रांत नवोन्मेषाला चालना देत आहेत. युवा शक्तीमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था भारतात निर्माण झाली आहे.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनात म्हैसूरचे विशेष स्थान असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, सुमारे १३० वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद तरुण संन्यासी म्हणून म्हैसूरला आले होते. त्यावेळी तत्कालीन म्हैसूर महाराजांनी त्यांना ओळखून पाठिंबा दिला होता. अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांनी महाराजांना लिहिलेल्या पत्रातही त्यांच्या सहकार्याचा उल्लेख केला होता. भारतीय संस्कृती आणि विचारांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे स्वामी विवेकानंद होते, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हैसूरच्या देवराज मोहल्ला येथील नारायण शास्त्री रस्त्यावर असलेल्या रामकृष्ण आश्रमाला भेट देऊन सुमारे ४५ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र (विवेक स्मारक)’चे उद्घाटन केले.

मंडकळी विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने ओव्हल मैदानावर दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री यतींद्र सिद्धरामय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मार्गभर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी घोषणाबाजी करत पंतप्रधानांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

रामकृष्ण आश्रमात पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून पूजा केली. त्यानंतर त्यांनी आश्रमात काही काळ ध्यानधारणा केली तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

म्हैसूरच्या नारायण शास्त्री रस्त्यावर स्वामी विवेकानंद काही काळ वास्तव्यास होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्रा’ची उभारणी करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले होते.

विशेष भेट
अयोध्येतील बालरामाच्या मूर्तीची निर्मिती करून देशभरात प्रसिद्धी मिळविणारे म्हैसूरचे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली स्वामी विवेकानंद यांची एकाश्म पांढऱ्या संगमरवरी मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आली. रामकृष्ण आश्रमाच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या या कलाकृतीमुळे म्हैसूरच्या समृद्ध शिल्पकलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *