Monday , August 17 2026
Breaking News

‘गृहज्योती’ लाभार्थ्यांमध्ये संभ्रम; अनेक भागांत पडताळणीच नाही!

Spread the love

 

३१ ऑगस्ट अंतिम मुदत; कर्मचारी न पोहोचल्याने लाभ बंद होण्याची भीती, नागरिकांची धावपळ

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहज्योती’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी मोहिमेला वेग आला असला, तरी हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रातील अनेक भागांमध्ये अद्याप कर्मचारीच पोहोचले नसल्याने हजारो लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला घराघरांत जाऊन पडताळणी सुरू असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे अनेक वस्त्या आणि गावांमध्ये कर्मचारी न आल्याने ‘पडताळणी न झाल्यास मोफत वीज योजनेचा लाभ बंद होणार का?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जुलै २०२३ पासून हेस्कॉमच्या सात जिल्ह्यांमध्ये ‘गृहज्योती’ योजना सुरू असून, सध्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची व्यापक पडताळणी सुरू आहे. मीटर रीडर आणि कर्मचारी आधार कार्डसह आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी घराघरांत भेटी देत आहेत. मात्र, अनेक भागांत ही प्रक्रिया अद्याप सुरूच न झाल्याने लाभार्थी स्वतःच पडताळणी केंद्रांचा शोध घेत फिरताना दिसत आहेत.

देवस्थान, समुदाय भवन तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या केंद्रांवर कागदपत्रे स्वीकारली जात असून, सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. ३१ ऑगस्ट ही पडताळणीची अंतिम मुदत असल्याने वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास योजनेच्या लाभाबाबत अनिश्चितता निर्माण होईल, अशी भीती लाभार्थी व्यक्त करत आहेत.

हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रातील बेळगाव जिल्ह्यात ‘गृहज्योती’ योजनेचे १० लाख ५ हजार १३ लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ लाख ४६ हजार १३ लाभार्थ्यांचीच पडताळणी पूर्ण झाली असून, अद्याप लाखो लाभार्थ्यांची पडताळणी बाकी आहे. त्यामुळे उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हेस्कॉमसमोर आहे.

पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, अलीकडील छायाचित्र, रेशन कार्ड, वीज बिल तसेच भाड्याच्या घरात राहत असल्यास भाडेकरार किंवा विहित अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कर्मचारी आपल्या भागात न आल्यास लाभार्थ्यांनी जवळच्या पडताळणी केंद्राशी संपर्क साधून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या असमान भेटी आणि अंतिम मुदतीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *