Monday , August 17 2026
Breaking News

‘घर भाड्याने हवे’च्या बहाण्याने वृद्धेला ८८ हजारांचा गंडा! ओटीपी मिळवत सायबर भामट्यांचा नवा फंडा

Spread the love

 

बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विळखा घालत असून आता ‘घर भाड्याने घेणार’ या बहाण्यानेही नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियावर घर भाड्याने देण्याची जाहिरात करणाऱ्या ८१ वर्षीय वृद्धेला विश्वासात घेत सायबर भामट्यांनी ८८ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना हनुमाननगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे ऑनलाइन व्यवहार करताना क्षणभराचा निष्काळजीपणा देखील मोठ्या आर्थिक फटक्याला कारणीभूत ठरू शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

फिर्यादी कल्याणी (वय ८१) यांनी घर भाड्याने देण्यासाठी सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ‘अलोक प्रताप सिंग’ असे नाव सांगणाऱ्या भामट्याने व्हॉट्सॲपवर संपर्क साधून घराची माहिती व छायाचित्रे मागवली. “घर पसंत पडले असून डिपॉझिटची रक्कम पाठवायची आहे,” असा बनाव करून त्याने वृद्धेचा विश्वास संपादन केला.

यानंतर ‘राजेंद्र शेखावत’ या नावाने दुसऱ्या व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करत बँक खात्याची माहिती घेतली. फोन-पे किंवा गुगल-पे नसल्याचे कळताच, “बँकेकडून येणारा ओटीपी सांगा,” अशी सूचना करण्यात आली. वृद्धेने ओटीपी सांगताच काही क्षणांतच त्यांच्या खात्यातून ८८ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

या प्रकरणी शहर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

सावधान! सायबर भामट्यांचा नवा डाव

घर भाड्याने घेणे, मालमत्ता खरेदी-विक्री, ऑनलाइन पेमेंट किंवा डिपॉझिटच्या नावाखाली बँक खात्याची माहिती, ओटीपी, यूपीआय पिन किंवा इतर गोपनीय माहिती मागितली जात असल्यास ती कोणालाही देऊ नये, अन्यथा क्षणात बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा या घटनेने पुन्हा एकदा दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *