

ऑगस्ट-सप्टेंबरचे रेशन एकाचवेळी; दोनदा बायोमेट्रिक अनिवार्य, ई-केवायसीमुळे ग्राहकांचीही धावपळ
बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसी मोहिमेचे काम सुरू असतानाच आता रेशन दुकानदारांवर आणखी एका मोठ्या जबाबदारीची भर पडली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य याच महिन्यात एकाचवेळी वितरित करण्यात येणार असल्याने रेशन दुकानदारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
या विशेष वितरणात लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार असले, तरी दोन्ही महिन्यांच्या नोंदीसाठी दोन वेळा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला सलग दोनदा अंगठ्याचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
दुसरीकडे, रेशन कार्ड ई-केवायसीची अंतिम मुदत जवळ आल्याने ग्राहकांची दुकानदारांकडे गर्दी वाढत आहे. ई-केवायसी आणि दोन महिन्यांच्या धान्य वितरणाची दुहेरी जबाबदारी एकाचवेळी पार पाडावी लागत असल्याने रेशन दुकानदारांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रेशन दुकानांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta