
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवार पेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी आरोग्य आणि आनंदासाठी पारंपरिक उपचार पद्धती या विषयावर बोलताना वेदना न होण्यासाठी रक्ताभिसरणाचे कार्य योग्यरितीने होणे गरजेचे आहे असे सांगून प्रात्यक्षिकासह अनेक टिप्स दिल्या व उपस्थितांचे शंका निरसनही केले.
टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी एकट्या दुकट्या वयोवृद्ध नागरिकांना लुटण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले.
अरूण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली. तर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, सुरेन्द्र देसाई, पांडुरंग कारकल, वसंत पाटील, एम. एस. हुद्दार यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले. के. एल. मजूकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta